‘गोकुळ’ला उच्चतम गुणवत्तेचे ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त

0
107

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) :  उच्चतम गुणवत्ता त्याचबरोबर उत्पादकांसोबत ग्राहकांचे हित व आधुनिकतेची जोड यामध्ये गोकुळ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यापूर्वी गोकुळच्या शाखा व मुख्य दुग्धशाळेने  अन्न व सुरक्षा कार्यप्रणालीनुसार कामकाज करत अनेक मानांकने मिळवली आहेत. आता ISO 22000 : 2018 हे मानांकन प्राप्त  झाल्याने गोकुळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्टीफिकेशनचे काम करणारी जर्मनमधील एजन्सी टीयुव्ही नॉंर्ड या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  १ ते  ६ मार्च  २०२१  या काळात मुख्य दुग्धशाळेबरोबर विविध शाखांना भेटी देऊन गोकुळच्या कामकाजाची तपासणी केली.  तपासणीमध्ये विशेषतः उत्पादीत होणारे गुणवत्तायुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ, अन्न सुरक्षा कार्यप्रणालीनुसार होणारे कामकाज, प्लॅंट स्वच्छता, दूध व दुग्धजन्य पदार्थ पॅकींगसाठी वापरणेत येणारे पॅकींग मटेरीयल व पॅकींगवेळी निघणारे वाया गेलेल्या पॅकींग मटेरीयलची केली जाणारी निर्गत इत्यादी बाबींचा विचार करून ISO 22000:2018  हे मानांकन देण्याचे जाहीर केले.  हे मानांकन मिळविणारा राज्याच्या सहकारी दुग्धव्यवसाय क्षेत्रातील गोकुळ दूध संघ हा एकमेव व पहिला दूध संघ  ठरला आहे. याचबरोबर मुख्य दुग्धशाळेकडे क्यु मार्क (गुणवत्ता व्यवस्थापन) ही कार्यप्रणाली राबविली जाते. ही गुणवत्तेची मानांकने मिळाल्यामुळे दूध उत्पादक व ग्राहकांचा गोकुळवर असलेला विश्वास वृद्धींगत होणार आहे. तसेच गोकुळची उत्पादने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुणवत्तेच्या जोरावर विक्रीस उपलब्ध करता येणार आहेत.

कोरोनाच्या काळातही गोकुळचे अधिकारी व कर्मचारी यांचे  मानांकन प्राप्त करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांनी चांगल्या प्रतीचे  दूध घातल्यामुळे हे मानांकन मिळवणे शक्य झाले.  यामुळे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनांना मुंबई, पुणे, गोवा येथील उच्चभ्रू ग्राहकांची पसंती मिळण्यास मदत होणार आहे. साहजिकच दूध उत्पादकांना  चांगला परतावा देणे शक्य होणार असल्याचे गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी सांगितले.