कागल (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची वरदायिनी आहे. या संघासमोर असलेले अमूल दूधचे आव्हान ‘गोकुळ’चे दूध उत्पादक शेतकरी परतवून लावतील, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

आठवड्यापूर्वीच आमदार मुश्रीफ यांनी संघाच्या संचालक व कर्मचाऱ्यांना दूध उत्पादन वाढीसाठी नवीन म्हशी घेण्याचे व त्याची सुरुवात स्वतःपासूनच करण्याचे आवाहन केले होते. मुश्रीफ यांनी स्वतः नवीन दोन म्हशी घेत या उपक्रमाची सुरुवात केली. जिल्ह्याबाहेरील बाजारातून आणलेल्या या दोन म्हशीचे मुश्रीफ यांनी गैबी चौकात स्वागत करण्यात आले.

आ. मुश्रीफ म्हणाले, म्हशीचे दूध वाढविण्यामध्ये आपण जर यशस्वी झालो, तर गोकुळ दुधाचा ब्रँड हा अमूलपेक्षाही मोठा होईल. अमूल दूध संघाने नाशिकमध्ये नुकतीच ८५० एकर जमीन घेतलेली आहे. तिथे ते म्हशीचा प्रकल्प उभारणार आहेत. तिथे उत्पादित म्हैशीचे दूध मुंबई बाजारात आणून गोकुळचे मार्केट ताब्यात घेण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. अमूलसारखा एवढ्या मोठ्या प्रकल्पाला तोंड द्यायचे असेल, तर म्हशीचे दूध उत्पादन वाढ करावी लागेल. गोकुळच्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखावर आहे. त्यापैकी चौथाई म्हणजे सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक-एक म्हैस जरी घेतली तरी अमूलचे आव्हान परतवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.

आठवड्यापूर्वीच दूधवाढीसाठी झालेल्या कार्यशाळेमध्ये आम्ही संकल्प सोडला की, नेत्यांनी व संचालकांनी प्रत्येकी दोन म्हशी तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक म्हैस घेतलीच पाहिजे. शेतकऱ्यांनाही एक म्हैस घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. केडीसीसी बँक त्यासाठी लागेल ते अर्थसहाय्य करील. गोकुळ दूध संघही त्यासाठी जास्तीत जास्त अनुदान देईल. म्हशी पंढरपुरी, मुरा, मेहसाणा अशा जातीच्या आणाव्या लागतील. पुढच्या टप्प्यात ५० टक्के शेतकऱ्यांपर्यंत आपण ही मोहीम राबविली, तर निश्चितच नव्याने दहा लाख लिटर दूध उत्पादन वाढेल. गेल्या वर्षापासून आम्ही सत्तेवर आल्यानंतर म्हशीच्या दुधाला सहा रुपये आणि गाईच्या दुधाला पाच रुपये दरवाढ दिली आहे. गोकुळ हा देशातील एक नंबर ब्रँड होण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.