कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळची निवडणूक यंदा अटीतटीची झाली आहे. कधी नव्हे ते इतकी चुरस अनुभवायला मिळत आहे. या निवडणुकीत मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. गेले काही दिवस त्यांनी जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे. पण बऱ्यापैकी उमेदवारांनी मतदाराशी थेट संपर्क साधताना स्वत:ला सुरक्षित ठेवण्यावरच भर दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत ‘सिंगल वोटिंग’ हा कळीचा आणि चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

गोकुळ निवडणुकीत या वेळी मातब्बर नेते आणि त्यांचे वारसदार रिंगणात आहेत. यामुळे यंदा निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. काही अशाच उमेदवारांनी आपले तिकीट गृहीत धरून प्रचाराचे रान उठविले आहे. गोकुळचा प्रचार तेव्हापासून व्यक्तिगत पातळीवर जोरदार सुरू आहे. त्या वेळी त्यांनी मतदारापर्यंत गेल्यानंतर मतदाराची मानसिकता पाहून स्वतःपुरते मत मागण्याची खेळी केली आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे रसद पूरविण्याची तयारीही दाखविली आहे. अर्थातच ही संधी मतदारांनीही सोडायची नाही असे ठरवले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि आघाडीच्या नेत्यांंनाही मतदार मत देण्याची ग्वाही देत आहे.

यंदा गोकुळच्या निवडणुकीत भलतीच चुरस अनुभवायला मिळत आहे. त्यात ‘क्रॉस वोटिंग’चे प्रमाण अधिक असणार हे बोलले जात आहे. पण काहीही झाले तरी काही उमेदवारांनी ‘सिंगल वोटिंग’ ची काढलेली शक्कल निवडणुकीत वेगळाच रंग भरणार हे मात्र निश्चित. गोकुळ निवडणुकीच्या ऐन धामधुमीत मतदारांच्या दृष्टीने ‘सिंगल वोटिंग’ हा भलताच चर्चेचा मुद्दा ठरत असून मतदारही यातून आपला ‘अर्थ’ साधून घेत आहेत.