गोकुळ निवडणूक : सत्यजित पाटील-सरूडकर यांची घरवापसी, विरोधी आघाडीला धक्का

0
11278

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळसाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत गेलेले शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर हे अखेर पुन्हा सत्तारूढ आघाडीत परतले. त्यांचे कट्टर विरोधक जनसुराज्यचे आमदार विनय कोरे हे महाविकास आघाडीत सामिल झाल्याने कार्यकर्त्यांची होणारी कोंडी लक्षात घेऊन त्यांनी अखेर आज (शुक्रवार) हा निर्णय घेतला. माजी आमदार महादेवराव महाडीक आणि आ. पी. एन. पाटील यांची सरूड येथे भेट घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला.

याबाबत लाईव्ह मराठीने काल (गुरुवार) रात्री सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या गटातील अस्वस्थेबाबत वृत्त प्रसारीत केले होते. त्यामुळे ते पुन्हा सत्तारूढ आघाडीत परत येण्याची शक्यता वर्तवली असल्याचे वृत्त दिले होते ते खरे ठरले. विरोधी आघाडीमध्ये आ. विनय कोरे यांच्या समावेशामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच सरुडकर यांच्या गटाला एकच जागा तर कोरे यांच्या गटाला दोन जागा का ? यावरून नाराजी आणखी वाढली होती.

गेले दोन दिवस सरूडकर यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन आज अखेर सरुड येथे त्यांच्या निवासस्थानी महाडीक आणि पी. एन. पाटील यांची बैठक झाली. यामध्ये सविस्तर चर्चा झाली. चर्चेमध्ये विनय कोरे यांचा समावेश सत्तारूढ पॅनेलमध्ये अजिबात होणार नाही, या अटीवर सरूडकर यांनी घरवापसी करण्याचा निर्णय़ घेतला. सरूडकर यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी गटाला पन्हाळा-शाहूवाडी भागामध्ये ताकद मिळाली आहे. तर विरोधी आघाडीला निवडणूकीपूर्वीच पहिला धक्का बसला आहे.