कोल्हापूर (श्रीकांत पाटील) : गोकुळ दूध संघासाठी २ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे अर्थातच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या गोटात सहभागी झालेले पन्हाळा-शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी आज (शुक्रवार) पुन्हा सत्ताधाऱ्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर विरोधी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या निवडणुकीत विचारात घेतले नसल्याची खंत व्यक्त करत पुढील दोन दिवसात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना दिलाय. त्यामुळे आता शेट्टी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गोकुळच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांविरोधात पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी निर्माण करून जोरदार तयारी केली आहे. सत्ताधारी गटातील काही संचालकांनी विरोधी आघाडीत जाणे पसंत केले आहे. विरोधी आघाडीतील नेते ‘गोकुळ’वर सत्ता स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असताना सत्ताधारी गटाकडून मात्र शांतपणे हालचाली सुरू आहेत. पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांनी सत्यजित पाटील-सरुडकर यांची भेट घेतल्यानंतर अपेक्षेप्रमाणे सरुडकर यांनी विरोधी गटाबरोबर जाण्याचा निर्णय बदलला.  काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीने विचारलं नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त करत आपली ताकद दाखवू असा इशारा दिला होता.

आज (गुरुवार) ‘लाईव्ह मराठी’ने शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता पुढील दोन दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. शिरोळ, पन्हाळा-शाहूवाडी, हातकणंगले, गडहिंग्लजसह विविध तालुक्यात ‘स्वाभिमानी’चे ५० मतदान आहे. त्यामुळे शेतकरी संघटना घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीबरोबर राहणार का की सत्ताधारी गटाला पाठिंबा देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.`