इचलकरंजी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र मानले गेलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी आघाडी आणि राजर्षी शाहू आघाडी यांच्यामध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता असताना इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. यामुळे या निवडणुकीतील चुरस आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

वास्तविक, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांनी ‘गोकुळ’वर आपली सत्ता कायम राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्याबरोबर असलेले काही विद्यमान संचालक विरोधी गटात गेल्याने पाटील आणि महाडिक यांनी इतरांना आपल्या गोटात ओढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही अंशी त्याला यशही आले आहे. तर कोणत्याही परिस्थितीत गोकुळ वर आपली सत्ता प्रस्थापित करायची या इराद्याने पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे सुरुवातीला काहीशी एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची बनली.

यातच आता इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी दोन्ही गटांत सामील न होता तिसरी आघाडी स्थापन करण्याची भूमिका घेतली आहे. आज (गुरुवार) त्यांनी इचलकरंजीत प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना या आघाडीबाबत सूतोवाच केले. गोकुळ संघ ही अत्यंत चांगली संस्था आहे. हा संघ आणखी चांगला चालावा ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठी तिसरा पर्याय उभा करण्याचा आमचा मानस आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोनच दिवसांपूर्वी महादेवराव महाडिक यांनी आ. प्रकाश आवाडे आणि त्यांचे वडील कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याशी निवडणुकीसंदर्भात भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र आवाडे यांनी त्यांना कोणताच शब्द दिला नव्हता. आपली भूमिका दोन दिवसानंतर स्पष्ट करू असे सांगून त्यांची बोळवण केली होती. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आणि ही आघाडी निवडणुकीत चांगले यश मिळवून सत्ता संपादन करेल असा विश्वासही व्यक्त केला. मात्र आपले सुपुत्र राहुल आवाडे हे या निवडणुकीत उतरणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले. आवाडे यांच्या भूमिकेमुळे गोकुळ संघाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असून तिसऱ्या आघाडीच्या अस्तित्वाचा फायदा किंवा तोटा कोणाला होणार हे निकालादिवशीच समजणार आहे.