‘गोकुळ’ निवडणूक : उमेदवारांना २ लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा

0
29

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आजपासून (गुरूवारी) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवाराचे स्वतंत्र बॅंक खाते असणे आवश्‍यक आहे. निवडणुकीचा खर्च या खात्यातून कऱणे बंधनकारक असून २ लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा असेल, अशा सूचना  निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

या पत्रकात म्हटले आहे की, बॅंक खात्याचा संपूर्ण तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ६० दिवसांत खर्चाचा हिशेब सादर करावा लागणार आहे. उमेदवारी अर्जासोबत उमदेवारांसह सूचक व अनुमोदक यांचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एका कागदपत्राची साक्षांकित प्रत जोडावी लागणार आहे. याशिवाय ३ पासपोट साईज फोटोही जोडावे लागणार आहेत. उमेदवार हा पंचकमिटी सदस्य हवा, संघाची थकबाकी नसल्याचा दाखला सोबत जोडला पाहिजे. याशिवाय निवडणूक पूर्वीच्या तीन वर्षे क्रियाशील सदस्य असल्याचा पुरावा, संस्थेने ३ वर्षात किमान १० टन पशुखाद्याची संघाकडून खरेदी करणे आवश्‍यक आहे. संस्थेचा ऑडिट रिपोर्ट, कागदपत्रेही जोडणे आवश्‍यक आहे. महिला वगळता इतर राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.