कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ताकेंद्र मानल्या गेलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी आज (गुरुवार) १२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये तीन विद्यमान संचालकांचा समावेश आहे.

संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता सत्तारूढ गट आणि राजर्षी शाहू आघाडीत लढत होणार आहे. आज पहिल्याच दिवशी १२ अर्ज दाखल करण्यात आले. अरुणकुमार डोंगळे, विश्वास नारायण पाटील व बाळासाहेब खाडे या तीन विद्यमान संचालकांनी अर्ज सादर केले. शशिकांत पाटील- चुयेकर, अजित नरके यांनी प्रत्येकी एक अर्ज, महाबळेश्वर चौगुले यांनी दोन, माजी संचालक बाबासाहेब चौगुले यांनी दोन तर विश्वास पाटील यांनी एकूण चार अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.