कोल्हापूर (प्रतिनिधी) : दूध उत्पादकांना दिलेले दरवाढीच्या आश्वासनाची पूर्तता करतोय. गोकुळ दूध संघाने म्हैस दुधाच्या खरेदीदरात प्रतिलिटर २ रुपये तर गाय दुध खरेदीदरात १ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ रविवार ११ जुलैपासून अमलात येत आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे जिल्ह्यात दूध विक्री दरात प्रतिलिटर २ आणि १ रुपये वाढ केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह इतरत्र मात्र विक्रीदरात वाढ होणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शुक्रवार) गोकुळच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ना. सतेज पाटील म्हणाले की, ज्या दूध उत्पादकांच्या कष्टावर हा संघ उभा आहे, त्या उत्पादकांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, अशी आमच्या आघाडीची भूमिका होती. म्हणूनच नुकताच झालेल्या संघाच्या निवडणुकीत प्रचारावेळी आम्ही सत्तेवर आलो तर दूध उत्पादकांना किमान दोन रुपये दरवाढ देऊ, असे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यावर अवघ्या काही दिवसांत त्याची पूर्तता करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. संघामध्ये सत्तेवर आल्यावर अवघ्या दीड महिन्यात आम्ही प्रत्येक पातळीवर खर्चात कपात करून तब्बल १२ कोटी रुपयांची बचत केली आहे. तसेच दूध उत्पादकांना अनेक नव्या आणि फायद्याच्या सोयीसुविधा प्रस्तावित केल्या आहेत. एकूण २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल आणि या सर्व दुधाला बाजारपेठ कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ना. पाटील यांनी पुढे सांगितले की, दुसऱ्या बाजूला आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा जास्त मोबदला द्यावा, असा प्रयत्न करीत आहोत. याच उद्देशाने म्हशीच्या दुधासाठी खरेदीदरात प्रतिलिटर दोन रुपये आणि गाईच्या दुधाला १ रुपये दरवाढ जाहीर करीत आहोत. ही दरवाढ प्रत्यक्षात ११ जुलैपासून अमलात येणार आहे.

या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा बँकेमार्फत जातिवंत म्हैस खरेदीसाठी दूध उत्पादकांना शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून कर्ज देण्यासाठी ५०० ते १००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

यावेळी खा. संजय मंडलिक, चेअरमन विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, राजेश पाटील आणि सर्व संचालक उपस्थित होते.