कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सुमारे ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ३१ मार्चनंतर निवडणूका घेण्याचा १६ जानेवारी २०२१ आदेश राज्य शासनाने आज (मंगळवार) रद्द केला. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. यामुळे गोकुळ, जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे.

ज्या टप्प्यावर निवडणूका स्थगित झाल्या होत्या तेथून पुढे निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार आणि पणन विभागाने काढले आहेत. बाजार समितीसह जिल्ह्यातील २४ बँका, बाजार समिती, २९ औद्यागिक संस्था, १३ प्रक्रिया संस्था, १२ खरेदीविक्री संघ, ६६ पतसंस्था असा निवडणूकांचा एकापाठोपाठ एक असा धुव्वा उडणार आहे.

मात्र, पहिल्या टप्प्यात गोकुळ आणि जिल्हा बँक त्यानंतर निवडणूक थांबलेल्या संस्थांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सहकार विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने दुसऱ्या टप्प्यात साखर कारखाने आणि मोठ्या बँकांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.