कुख्यात गुन्हेगारांना धाडसाने जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षकासह अंमलदाराचा गौरव

0
54

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार चिन्या उर्फ संदीप हळदकर व त्याच्या तीन साथीदारांनी पेट्रोलला पैसे न दिल्याच्या कारणावरून साजिद शेख या युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. राजारामपुरी ठाण्याचे प्रभारी पो. नि. सीताराम डुबल यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदार युवराज पाटील यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन या गुन्हेगारांना शिताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतले.  

पो. नि. डुबल व अंमलदार युवराज पाटील यांच्या या कामगिरीची दखल घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी या दोघांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे.