शिरोली दुमाला येथे कोरोना योध्द्यांचा गौरव

0
173

सावरवाडी (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागात प्रभावीपणे कार्य केल्याबद्दल करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे ग्रामपंचायत, विश्वासराव पाटील फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना योध्द्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच व यशवंत बँकेचे माजी संचालक नंदकुमार पाटील होते.

यावेळी बोलताना गोकुळ दूध संघाचे  माजी चेअरमन विश्वासराव पाटील म्हणाले की, कोरोना काळात गावात सर्वांनी विशेष काळजी घेऊन चांगले कार्य केल्याबद्दल कोरोना योद्धांना  गौरविण्यात येत आहे. गाव कोरोना मुक्त करण्यासाठी मतभेद विसरुन सर्वजण एकत्र आल्याने एकीचे दर्शन घडले आहे.

यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, माजी सरपंच नंदकुमार पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मधुरा मोरे, बाजीराव पाटील, स्मिता पाटील – शिंदे, राहुल पाटील, आदीनी मनोगत व्यक्त केली. ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील, सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सरदार पाटील, माजी सरपंच एस. के. पाटील, सचिन पाटील, संजय पाटील, युवराज देसाई, माधव पाटील यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी प्रास्ताविक केले. मच्छिद्र कांबळे यांनी आभार मानले.