कागल (प्रतिनिधी) : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी लोकहिताच्या निर्णयांना नेहमीच प्राधान्य दिले. कारखाना व शेतकऱ्यांच्या हितासाठी तडजोड केली नाही. त्यांचे हे धोरण राज्यभर “शाहू पॅटर्न” म्हणून नावाजले गेले. या वर्षी शेतकरी अडचणीत असताना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय हा याच पॅटर्नचा एक भाग आहे. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन  राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते   शाहू साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी बोलत होते.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की,  आज सर्वत्र शाहू पॅटर्न यशस्वी म्हणून नावाजला जातो. मात्र त्यासाठी स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी अत्यंत कष्ट घेतले आहेत. प्रसंगी कटू निर्णय घेतले त्यांना आपण सर्व सभासद शेतकरी बांधवांनी साथ दिली. त्यामुळे हा पॅटर्न नावारूपास आला आहे. शाहू पॅटर्नमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेऊ शकलो. हा निर्णय कुणाला त्रास देण्यासाठी किंवा अडचणीत आणण्यासाठी नाही तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी घेतला असल्याचे सांगितले.

यावेळी गव्हाण पूजा ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ आशाराणी पाटील, केनयार्ड विभागामध्ये संचालक मारुती निगवे व त्यांच्या सुविद्य पत्नी भारती निगवे व काटा पूजन संचालक पी.डी.चौगुले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. हौसाबाई चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,  सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.