धामोड (प्रतिनिधी) : छत्रपती राजाराम कारखान्याने उच्च दर दिलेला नाही. त्यामुळे सभासदांच्या उसाला चांगला दर देण्यासाठी राजाराम कारखान्याची सत्ता आता आमच्या हाती सोपवावी, असे आवाहन आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी केले.
राजाराम साखर कारखान्याच्या 2023-28 पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राधानगरी तालुक्यातील सर्व सभासदांच्या भेटीगाठी दरम्यान धामोड पैकी जाधववाडी येथे सभासदांच्या समोर ते बोलत होते.
सतेज पाटील म्हणाले, आजपर्यंत राजाराम कारखान्याचा इतिहास पाहिला असता एकदाही या कारखान्याने उच्च प्रतीचा दर दिलेला नाही आणि ऊस दराचा विषय समोर काढला की, सत्ताधारी मंडळी सहा तालुक्यांतील ऊस वाहतुकीच्या खर्चाचा विषय समोर मांडतात. जिल्ह्यातील इतर कारखान्यांमध्ये गाळप होणारा ऊस कारखान्यातच तयार होतोय की काय? हे आम्हाला समजत नाही. आम्ही देखील डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यासाठी चार-पाच तालुक्यांतून ऊस वाहतूक करतो. तरीही यांच्यापेक्षा दीडशे रुपये दर जास्त दिलेला आहे. आम्हाला वाहतुकीचा खर्च येत नाही का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गेली पंधरा ते वीस वर्षे मयत असणाऱ्या तीन-साडेतीन हजार सभासदांचे शेअर्स त्यांच्या वारसांच्या नावावर अद्याप झालेले नाहीत. या मागचे गौडबंगाल काय? या पंचवार्षिक निवडणुकीत आमच्या हातामध्ये कारभार द्या. पहिल्या महिन्यामध्ये सभासदाच्या वारसांना बोलवून आम्ही शेअर्स ट्रान्सफर करण्याचा शब्द देतो, असेही ते म्हणाले. यावेळी राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने, दगडू चौगले, महिपती खडके, शंकर जाधव, आनंदा जाधव आदीसह सर्व सभासद उपस्थित होते.