कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग वाढला आहे. सर्व रूग्णांवर उपचाराठी सीपीआरमध्ये जागा कमी पडत आहे. त्यामुळे सीपीआरजवळील जुनी कोर्टाची इमारत कोरोना उपचार केंद्रासाठी द्यावी अशी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे सरकारकडे करण्यात आली.

यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी प्रयत्न करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र धडपडत आहेत. उपचारासाठी जागा कमी पडत आहे. सीपीआर हॉस्पिटल मुख्य आहे. तेथेही उपचारास जागा अपुरी पडत आहे. ऑक्सिजनची टंचाई भासत आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सीपीआर परिसरात टँक उभारण्यात आला आहे. मनुष्यबळ आहे. पण जागा अपुरी पडत आहे. म्हणून जुनी कोर्टाची इमारत देण्याच्या मागणीला जोर धरला आहे. मात्र, न्याय, विधी खात्याचे आडमुठे धोरणामुळे इमारत मिळण्यात अडचणी येत आहेत. राज्य सरकारचे सचिव आणि अधिकाऱ्यांनी कोर्टाची इमारत मागू नका, असे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे. पण, दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. उपचारासाठी जागा अपुरी पडत असल्याने सीपीआरजवळील जुनी कोर्टाची इमारत सरकाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी एका प्रसिध्द पत्रकातून करण्यात आली आहे.