कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेबरोबर अन्य १० योजनांद्वारे निराधारांना अनुदान दिले जाते. संपूर्ण जिल्ह्यात लाभार्थ्यांची आकडेवारी १,३६,३७८ इतकी आहे. परंतु गेली ३ महिने हे मिळणारे अनुदान रखडल्यामुळे अनुदानाच्या प्रतिक्षेत असणारे लाभार्थी यापासून वंचित राहिले आहेत.

या गरजू, गरीब, वृद्ध लाभार्थ्यांना यासाठी सतत बँकेत ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे अशा लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही बँकांमध्ये या वृद्ध, निरक्षर लाभार्थ्यांवर अरेरावीची भाषा वापरली जात आहे. लाभार्थ्याला आपले खाते पुस्तक प्रिंट घेऊन आपल्याला कोणत्या महिन्याचे पैसे प्राप्त झाले, याची माहिती मिळत असते. परंतु बॅंकांमध्ये कोरोनाचे कारण पुढे करून पुस्तक भरून मिळणार नाही, असे जाहीर बोर्डच लिहले आहेत. यापूर्वी कोषागारातून उणे निधी (मायनस बजेट) या तरतुदीखाली लाभार्थ्यांना अनुदान दिले जात होते. पण राज्य शासनाने ही पद्धत बंद केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी अनुदान मिळणार याच्या प्रतिक्षेत आस लावून बसले आहेत.

आज (सोमवार) या निराधार योजनेमधील लाभार्थ्यांच्या प्रश्नाबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारे निवेदन देण्यात आले. यामध्ये लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला अनुदान प्राप्त व्हावे, बँकेत लाभार्थ्यांना पुस्तक प्रिंट करून दिले जावे, लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन होण्यासाठी सहाय्य कक्षाची स्थापना व्हावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संजय गांधी निराधार योजना माजी सदस्य अशोक लोहार यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.