जळगांव (प्रतिनिधी) : पाच लाखांच्या खंडणी प्रकरणी भाजपचे नेते आणि आमदार गिरीष महाजन यांच्यासह २८ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील कोथरुढ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मराठी विद्याप्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकांचे अपहरण करुन त्यांना चाकूचा धाक दाखवून राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर आरोप आहे.

संस्थेच्या वादात भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी निंभोरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलिस स्थानकात वर्ग करण्यात आला.

अॅड. भास्कर पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत. दरम्यान पुण्यात संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. पुण्यात आल्यानंतर शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्याला देखील त्यांनी या ठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली होती. हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला होता. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा केली आहे. याप्रकरणी महाजन, रामेश्वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण २८ जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता. यानंतर आता कोथरूड स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.