कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथील एका शाळेलगत असणाऱ्या गोडावूनमधून चारचाकी गाडीच्या माध्यमातून परिसरातील गावात गुटखा पोहचविला जात असल्याची चर्चा सुरु आहे. या गुटखा विक्रेत्याला संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे सहकार्य असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे घोसरवाड येथील गुटखा विक्रीवर कारवाई होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गावे कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहेत. याचाच फायदा घेऊन कर्नाटक राज्यातील गुटखा विक्रीचे जाळे सीमाभागातील गावात पसरले आहेत. त्यापैकीच एक असलेले घोसरवाड आहे. या गावात एका शाळेशेजारीच गुटख्याचे गोडाऊन असल्याचे बोलले जात आहे. हा गुटखा घोसरवाड परिसरातील गावात पुरवला जात असल्याची चर्चा आवाजात सुरू आहे.

चारचाकी गाडीतून हा गुटखा व्यापार्‍यांच्याकडे दिला जातो. तसेच काही व्यापारी घोसरवाड येथे येऊन गुटखा घेऊन जातात. मात्र, याकडे कुरुंदवाड पोलिसांचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात कुरुंदवाड पोलिसांकडून गुटखा विक्रीवर जरब बसवण्यासाठी कारवाईची मोहीम राबवण्यात आली. यावेळी कर्नाटक सीमा भागात येणारा गुटखा पूर्णतः थांबला होता. मात्र अलीकडेच या कारवाईची मोहीम थंड पडल्याने गुटखा विक्रीचे जाळे पुन्हा पसरत चालले आहे. त्यामुळे अशा गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई होणार का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.