रेगे तिकटी येथील रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करा : आखरी रास्ता कृती समिती

0
60

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश – शिवाजी पूल या आखरी रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा थांबवून येथील सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्षात आपण संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रशासक म्हणून पहाणी करावी. आणि रेगे तिकटी येथील रस्त्याचे काम पूर्ण होताच दुसऱ्या दिवशी पाण्याची गळती काढण्यासाठी पुन्हा खुदाई करण्यात आली. त्यामुळे याला जबाबदार प्रशासन अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करून नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी आज (बुधवार) आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की गंगावेश – शिवाजी पूल रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने वारंवार आंदोलन, निवेदने दिल्यानंतर प्रशासनाच्या वतीने या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. यामध्ये या कामापूर्वी ड्रेनेज आणि पाणीपुरवठा विभागाकडून पाईपलाईनीची सर्व कामे करून घ्यावीत आणि मगच रस्ता करण्याची मागणी केली होती. मात्र रेगे टिकटी येथे पाण्याची गळती काढण्यापूर्वीच रस्ता करण्यात आला. आणि दुसऱ्या दिवशी रस्त्याची खुदाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी आणि त्याच्यांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान या कामाची आपण प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करावी, अशी मागणी ही शिष्टमंडळाच्या वतीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, रियाज बागवान, युवराज जाधव, सुरेश कदम,महेश कामत यांच्या सह आखरी रास्ता कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.