राधानगरी (प्रतिनिधी) : सरवडे, ता. राधानगरी येथील दूधगंगा नदीवरील पूलावर कचऱ्याचा ढीग साचला आहेत. यामुळे भटक्या श्वानांनी अन्नाचा शोध घेण्यासाठी कचरा रस्स्यावर विखुरला आहे. या मार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना श्वानांचा उपद्रव व घाणीच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.

दूधगंगा नदीवर सरवडे-मांगेवाडी दरम्यान मोठा पूल उभारण्यात आला आहे. या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. परंतु पूलाच्या पश्चिमेकडील मांगेवाडीच्या बाजूस नेहमीच कचरा आणि घाणीचे साम्राज्य असते. याठिकाणी अज्ञाताकडून टाकण्यात येणारे टाकाऊ मांसजन्य पदार्थ व घरगुती कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. हा कचरा श्वानांच्या वावरामुळे अक्षरशः रस्त्यावर पसरला आहे. येथे श्वानांचा नेहमीच संघर्ष बघायला मिळतो. श्वान हिंस्र बनल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. तसेच घाणीमुळे मोठा उग्र वास येत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.

श्वानांमुळे ही सर्व घाण व कचरा नदी पात्रात पडत आहे. याचा पिण्याच्या पाण्यावर मोठा परिणाम होणार असून नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. नागरिकांच्या जीवाचा व आरोग्याचा विचार करून दोन्ही गावच्या ग्रामप्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. यावर कडक उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.