टोप-संभापूर रस्त्यावर साचलेत कचऱ्याचे ढीग : मनसेची कारवाईची मागणी

0
450

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील रँबो ग्राऊंड येथे टोप-संभापूरमधील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो. यामुळे परिसर अस्वच्छ होऊन मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने हातकणंगले उपतालुकाप्रमुख वैभव भोसले यांनी केली. याबाबतचे निवेदन संभापूर सरपंचांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, संभापूर गावातील कचरा टोप हद्दीत पडत असून यामुळे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. वाहतुकीस अडचण होत आहे, तसेच दुर्गंधीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा पेटल्यास मोठा धूर होत असून तो राष्ट्रीय महामार्गावर पसरतो. या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक तसेच मोठे व्यावसायिकही आपला कचरा टाकत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी.

संभापूरचे सरपंच प्रकाश झिरंगे यांनी या ठिकाणी लवकरच स्वच्छता अभियान राबवून येथे पुन्हा कचरा टाकणार नाही, याची काळजी घेऊ असे सांगितले. हा गट क्रमांक टोपच्या हद्दीत येत असून टोप ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, असे मत व्यक्त केले.

यावेळी सनी तेली, सूरज चौगुले, अमोल चव्हाण, विजय उत्तुरकर, सूरज पाटील, शिवाजी पाटील, उदय कारंडे, कृष्णात पाटील, सूरज कारंडे, चैतन्य चव्हाण, प्रारब्ध पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.