कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर ‘स्वच्छ आणि सुंदर’ आणि ‘प्लास्टिक मुक्त’ करीत आहेत. मात्र, मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या भागात कचऱ्याचा आणि प्लास्टिकचा कोंडाळा असल्याचे चित्र दिसून येते. याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येते. त्यामुळे महापालिकेचा ‘स्वच्छता विभाग’ करतो तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

कोल्हापूरची सुंदरता वाढावी यासाठी अनेक चौकांचे सुशोभीकरण केले आहे. पण सुशोभीकरण केलेल्या चौकात स्वच्छता आहे की नाही, याकडे मात्र पूर्णपणे कानाडोळा केल्याचे दिसून येते. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील महालक्ष्मी चेम्बर्सच्या समोर असलेल्या पार्किंगमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे. पण यामध्ये असणाऱ्या झाडाझुडपामध्ये पत्रावळ्या, दारूच्या आणि पाण्याच्या बाटल्या,प्लास्टिक यासारख्या अनेक वस्तू टाकल्या गेल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. कोल्हापूरचे सुशोभीकरण होते की दुर्गंधीकरण. याकडे महापालिकेचा ‘स्वच्छता विभाग’ लक्ष देणार का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.