इचलकरंजी (प्रतिनिधी) : सांगली नाका परिसरातील कचरा डेपो तातडीने हटवावा आणि डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे होणारे प्रदूषण रोखावे, यासह अन्य मागण्यांसाठी आज (सोमवार) सांगली नाका कचरा डेपो कृती समितीच्या वतीने इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला.

सांगली नाका परिसरात असणाऱ्या कचरा डेपोला वारंवार आग लागून धुराचे लोट पसरुन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याशिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठून त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे यापासून बचाव होण्यासाठी वारंवार सदर परिसरातील नागरिकांनी पालिका प्रशासनाला कळवूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष्य वेधण्यासाठी आज (सोमवार) कृती समितीच्या वतीने इचलकरंजी पालिकेच्या प्रवेशव्दारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच शिष्टमंडळाने नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्याकडे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

वारंवार लागणा-या आगीमुळे प्रदूषण होण्याबरोबरच कचरा साचून दुर्गंधी फैलावून नागरिकांना विविध आजाराच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हा कचरा डेपो तातडीने हटवावा, कचरा डेपोतील आग विझवण्यासाठी आवश्यक ती तरतूद १८ जानेवारीपर्यंत करावी, शिफ्टमध्ये कामगारांची नेमणूक करावी, आग विझवण्यात कसूर झाल्यास संबंधित स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित करावी, कचरा डेपोसंदर्भात श्वेतपत्रिका काढून ती जाहीर करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास यापुढे शहरातील कोणताही कचरा या कचरा डेपोमध्ये टाकण्यास आम्ही सर्व नागरिक विरोध करू, असा इशाराही देण्यात आला.

या धरणे आंदोलनात डॉक्टर आरती कोळी, मंगल सुर्वे, प्रदीप दरीबे, जीवन कोळी, राजू कोरे, किरण माळी, शेखर पवार, सुधीर जोशी, डॉक्टर आनंद कोळी आदी सहभागी झाले होते.