कोल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश ते रेगे तिकटी रस्त्याचे काम दोन दिवसात सुरू करू. तसेच पंचगंगा हॉस्पिटल ते पिकनिक पॉईंट काँक्रीट रस्त्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या मार्गावरील पाईपलाईनची क्रॉस कनेक्शन युद्धपातळीवर पूर्ण करून चांगला दर्जेदार रस्ता त्वरित करू, असे आश्वासन महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी शिष्टमंडळाला दिले. 

गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याबद्दल आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किशोर घाटगे, सुरेश कदम, रियाज बागवान, सनी अतिग्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन दिले.

गंगावेस ते शिवाजी पूल रस्ता हा शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून कोकण, गगनबावडा, गोवा, जोतिबा, पन्हाळा या मार्गावरील वाहतूक या रस्त्यावरून चालू असते. हा रस्ता आखरी रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरील पाईपलाईनचे काम झाल्यानंतर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून धुळीचा नागरिकांना त्रास होत आहे. तरी कोणत्याही परिस्थितीत वेळकाढूपणा न करता सदरचे काम त्वरित करण्यात यावे, असे मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले. यावर आयुक्तांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सुशील भांदीगिरे, किरण मांगुरे, महेश कामत, पंचगंगा रिक्षा स्टॉपचे व नागराज रिक्षा स्टॉपचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.