कोल्हापुरात गोडाऊन फोडणाऱ्या महिलांची टोळी गजाआड : ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
31

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात १७ ऑगस्ट २०२१ रोजी नागाळा पार्क येथील चंदवानी सिरॅमिक गोडावून फोडून लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

मंगल उत्तम गोसावी (वय ४५), कमल विलास गोसावी (४५), बायनाबाई उर्फ बाई दधन गोसावी (५०), सुरेखा बाळासो गोसावी (३०), दिपाली विशाल गोसावी (२५), सुषमा संजय गोसावी (३२), सारिका सागर गोसावी (३०), नानी शामराव गोसावी (४२) सर्व राहणार ( इंदिरानगर, गोसावीवाडी, वडणगे ता. करवीर ) अशी अटक केलेल्या महिला चोरट्यांची नावे आहेत.

 

 

त्यांच्या कडून सॅनिटरी वेअरचे जग्वार कंपनीचे, सिरॅमिक्स तसेच ब्रास मेटल असा ७ लाख १३ हजार २७२ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. चोरीप्रकरणी दिलीप गोविंदराम चंदवानी ( रा. ताराबाई पार्क, व्यंकटेश्वरा अपार्टमेंट, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार  दाखल केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, १७ ऑगस्ट २०२१ रोजी नागाळा पार्कातील चंदवानी यांच्या मालकीच्या गोडाऊनला लावलेले कुलूप व लॉकपट्टी उचकटून चोरटयानी आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सॅनिटरी वेअरचे जग्वार कंपनीचे सिरॅमिक्स, ब्रास मेटल असा सुमारे ७ लाख १३ हजार २७२ रुपये किंमतीचे साहित्य लंपास केले होते. संबंधित महिला आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची कसून  चौकशी केला असता या महिलांनी चोरीची कबुली दिली.

ही कारवाई शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री कृष्ण कटकधोंड, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक निरीक्षक सागर पाटील, कॉन्स्टेबल राहुल पाटील, शिल्पा आडके, वनिता घारगे, धमेंद्र बगाडे, सागर माने, शुभम संकपाळ, सुशील सावंत यांनी केली.