कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील गणेश मंडळांनी नेहमीच समाज प्रबोधनपर आणि कृतीशील उपक्रम राबवले आहेत. यंदा कोरोना संकटाच्या काळातही विविध मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी व विधायक उपक्रम राबवले आणि गणेशोत्सवाला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त करुन दिले. हे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्‌गार धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी काढले. गणेश मंडळांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

कावळा नाका येथील धनंजय महाडिक युवाशक्ती संपर्क कार्यालय येथे धनंजय महाडिक युवा शक्ती व समाजमन संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला समाजमन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश गावडे उपस्थित होते.

यावेळी यंदा कोरोना काळातही ज्या मंडळांनी विधायक व समाजपयोगी उपक्रम राबवले, अशा मंडळांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये प्रिन्स क्‍लब- खासबाग, तुकाराम माळी तालीम मंडळ- मंगळवार पेठ, मंगलमूर्ती मित्र मंडळ- कुटवाड, बलशाली युवा ह्दय क्रांती सामाजिक संस्था- सावर्डे दुमाला, कोल्हापूर गणेशोत्सव २०२० -टीम गणेशा- मंगळवार पेठ आदी मंडळांसह सावली केअरचे प्रकल्प संचालक किशोर देशपांडे, एनकेपी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली बगाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला सतीश वडणगेकर, शरयू भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा.एम.टी.पाटील यांनी तर आभार सतिश वणिरे यांनी मानले.