कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) २०२१ ते २०२६ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे विभाग यांचेतर्फे हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आज (सोमवार) प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १२ मार्च २०२१ अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची तारीख असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) गजेंद्र देशमुख यांनी दिली.

‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी एकूण ३६६४ सभासद संस्थांपैकी ३६५९ संस्थांनी ठराव दाखल केले आहेत. अद्याप ५ संस्थांचे ठरावच आलेले नाहीत. त्यानुसार आज ३६५९ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली.  देशमुख यांनी सांगितले की, यादीवरील हरकती व तक्रारी १५ ते २४ फेब्रुवारीपर्यंत दाखल करता येणार आहेत. यावर ८ मार्च रोजी निकाल देण्यात येणार आहे. त्यानंतर १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. ज्या संस्थांचे दुबार ठराव दाखल झालेले आहेत, त्याचीही सुनावणी होऊन निकाल ८ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.