गडमुडशिंगी, चिंचवाड, वळीवडेसह गांधीनगर बाजारपेठेत शुकशुकाट…

0
186

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या वीकएण्ड लॉकडाऊनमुळे संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेसह गडमुडशिंगी वळीवडे व चिंचवाड येथे आज (शनिवार) शुकशुकाट राहिला. व्यापारी वर्ग, ग्राहक आणि ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदीच्या आदेशाचे काटेकोर पालन करत कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी विकेंड संचारबंदीचा आदेश लागू केला. गांधीनगर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवून जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. तावडे हॉटेलपासून चिंचवाड रेल्वे फाटकपर्यंतची सर्व दुकाने बंद राहिली. ग्राहक व ग्रामस्थांनीही महामारीची घरी राहणेच पसंत केले. त्यामुळे एरवी गजबजलेली बाजारपेठ निर्मनुष्य होती. बाजारपेठ बंद राहिल्याने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जनतेमध्ये जागृती होत असल्याचे स्पष्ट झाले.

तावडे हॉटेलपासून चिंचवाड रेल्वे फाटकपर्यंत सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात होता. गडमुडशिंगी, वळीवडे व चिंचवाड येथेही रस्त्या-रस्त्यावर शुकशुकाट होता. वाहनेही कुठे दिसत नव्हती. नेहमी वाहनांची वर्दळ असणारा उचगाव-गडमुडशिंगी रस्ता सुनासुना होता. भाजी मंडईसह केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. मात्र तिकडेही  ग्राहकांनी पाठ फिरवली.