अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

0
119

कोल्हापूर(प्रतिनिधी):  कोल्हापूर शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग रचनेत बदल करून दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देणारे पत्र नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती माजी आमदार अमल महाडिक यांनी दिली        

मागील काही वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्याला सातत्याने महापुराचा फटका बसत आहे या पूरस्थितीला भौगोलिक तसेच विविध भौतिक बाबी कारणीभूत आहेत. कोल्हापूर शहराजवळून जाणारा पुणे- बंगळुरू महामार्ग हे सुद्धा यातील एक प्रमुख कारणीभूत घटक ठरत आहे. या महामार्गाचा आराखडा पाहिल्यानंतर लक्षात येते की, एकप्रकारे हा महामार्ग धरणाचे काम करतो आहे. पावसाळ्यामध्ये डोंगरी भागातून वाहत येणारे पाणी महामार्गाच्या रचनेमुळे अडवले जाते आणि पंचगंगेच्या पात्रातून हे पाणी बाहेर पडून कोल्हापूर शहरामध्ये पसरते. यात भरीस भर म्हणून शहरात नालेसफाई नसल्याने शहरातील नाले सुद्धा तुंबतात आणि जवळपास पूर्ण शहर पाण्याखाली जाते. शिवाय पंचगंगेच्या पाण्याने ठराविक उंची गाठल्यानंतर हा संपूर्ण महामार्ग पाण्याखाली येतो,  ज्यामुळे सर्व वाहतूक ठप्प होते व शहराचा पूर्ण संपर्कही तुटतो.प्रत्येक वर्षी या समस्येला सामोरं जावं लागत असल्याने अक्षरशः पावसाळा आला की कोल्हापूरकरांच्या अंगावर काटा येतो. मात्र आता सातारा – कागल सहापदरीकरणाच्या कामादरम्यान यावर उपाय म्हणून पुलांची उंची वाढविणे, बोगदे तयार करणे, नवीन पुलांची उभारणी करणे, भराव कमी करणे यासह इतर सर्व घटकांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामुळे पावसाळ्यात महामार्ग वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.