गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मध्यंतरी काही काळ खंडीत झालेली गडहिंग्लजची समृद्ध नाट्यपरंपरा पुन्हा नव्या जोमाने रुजविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सांगितले. गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रयत्न सुरू असून त्यासाठी ‘गडहिंग्लज कला अकादमी’चे शनिवारी (दि. ७) रोजी उद्घाटन होत आहे. यासाठी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक स्वप्निल राजशेखर उपस्थित राहणार आहेत. नगराध्यक्ष दालनात झालेल्या पत्रकार बैठकीत कोरी यांनी ही माहिती दिली.

यावेळी कोरी म्हणाल्या की, ‘समाजाचा सर्वांगीण विकास होत असताना सांस्कृतिक विकास होणंही तितकंच महत्वाचं आहे. गडहिंग्लज कला अकादमीच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. इथं माफक फी मध्ये लहान मुलामुलींसाठी एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स करता येणार असून सिने-नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच नगरपरिषद आणि कला अकादमी यांच्या माध्यमातून दरवर्षी नाट्यमहोत्सव घेण्यात येणार आहे.’

यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, अकादमीचे प्रा. शिवाजी पाटील, डॉ. मंगल मोरबाळे, प्रा. निलेश शेळके आदी उपस्थित होते.