गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजचे ग्रामदैवत आणि पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळभैरीची यात्रा यावर्षी कोरोनामुळे भाविकांसाठी रद्द करण्यात आली. मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी करण्यात येणार असून याचे थेट प्रक्षेपण भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कुणालाही यात्रा काळात १ किलोमीटर पर्यंतच्या मंदिर परिसरात अजिबात सोडले जाणार नसल्याची माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी काळभैरी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येत भाविक येत असतात. यावर्षी २८ फेब्रुवारीला पालखी सोहळा आणि १ मार्च हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी ही यात्रा रद्द करून फक्त धार्मिक विधी पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने काटेकोर नियोजन  केल्याचे पांगारकर यांनी स्पष्ट केले. गावातील मंदिरातून डोंगरावरच्या मंदिराकडे २८ तारखेला पालखी ही फक्त मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत वाहनातून नेण्यात येणार आहे. शिवाय या दिवशी रविवार असल्याने या दिवशीचा आठवडा बाजारही रद्द करण्यात आला आहे. मुरगूडहून येणारी पालखी सुद्धा फक्त चार मानकऱ्यांच्या उपस्थितीत वाहनातून  आणण्यात येणार आहे.

शिवाय शासकीय पूजा, छबिना यासाठी सुद्धा मोजक्याच मानकऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार असून फक्त त्यांनाच प्रवेश देण्यात येईल. नैवेद्य देण्यासाठी गावातील एकाच महिलेला संधी देण्यात येईल. सर्व विधी पूर्ण करणारे पुजारी, मानकरी आणि प्रशासकीय अधिकारी असे मिळून ही संख्या ५० पेक्षा जास्त होणार नाही याचे काटेकोरपणे नियोजन केल्याचे पांगारकर यांनी सांगितले.

२८ तारखेपासून काळभैरी मार्ग खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक ही वडरगेमार्गे वळविण्यात येणार आहे. मंदिर परिसरात एक किलोमीटर पर्यंतच्या भागात कुठल्याही भाविकाला प्रवेश देण्यात येणार नाही. यासाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. यात्रा काळातील सर्व धार्मिक विधीचे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रशासन प्रयत्न करणार असून भाविकांनी घरातूनच त्याचा आनंद घ्यावा असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने पांगारकर यांनी केले.

या वेळी तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, गटविकास अधिकारी शरद मगर, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते.