गडहिंग्लज पं. स. च्या उपसभापतीपदी ‘स्वाभिमानी’चे इराप्पा हसुरे…

0
642

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इराप्पा हसुरे यांची आज (सोमवार) बिनविरोध निवड झाली.  ‘राष्ट्रवादी’च्या श्रिया कोणकेरी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी समविचारी आघाडीच्या माध्यमातून आता स्वाभिमानीला ही संधी मिळणार हे गृहीत होते. अपेक्षेप्रमाणे आज हसुरे यांची बिनविरोध निवड झाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब झाले.

गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी यांची सात सदस्यीय समविचारी आघाडी अस्तित्वात असून भाजपचे तीन सदस्य विरोधात आहेत. तहसीलदार दिनेश पारगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलेल्या आजच्या विशेष सभेकडे भाजपच्या तीनही सदस्यांनी पाठ फिरवली. हसुरे यांचा एकमेव अर्ज असल्याने पारगे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. विद्याधर गुरबे हे हसुरे यांच्या अर्जाला सूचक आहेत.

हसुरे यांच्या निवडीनंतर पंचायत समितीच्या सभागृहातच त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी जि. प. सदस्या रेखाताई हत्तरगी आणि स्वाभिमानीचे राज्यसचिव राजेंद्र गड्यांनावर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गड्यानावर  यांनी, स्वाभिमानीच्या एकमेव सदस्य असलेल्या हसुरे यांना आघाडीच्या वेळी दिलेल्या शब्दनुसार उपसभापतीपदी निवडीची संधी दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.

तसेच तानाजी देसाई, वरदशंकर वरदापगोळ आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.