गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ‘यशवंत पंचायत राज’मध्ये एक वेळा राज्यस्तरावर प्रथम तर तब्बल पाच वेळा विभागीय स्तरावर गडहिंग्लज पंचायत समितीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. सर्वच सदस्य प्रशासनासोबत हातात हात घालून विविध नावीन्यपूर्ण योजना राबवत पंचायत समितीला अधिकाधिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मूल्यांकन समिती मात्र प्रत्यक्ष पंचायत समितीत येऊन काम पाहणे, सूचना आणि प्रोत्साहन देण्याऐवजी पाठवलेल्या प्रस्तावावर एसीमध्ये बसून गुणांकन करत आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे ‘म्हैस पाण्यात ठेवून तिची किंमत ठरवण्याचा’ आहे अशा शब्दांत सदस्य विद्याधर गुरबे यांनी खिल्ली उडवली. ते आज (गुरुवार) पंचायत समितीच्या मासिक सभेत बोलत होते. सभापती रुपाली कांबळे अध्यक्षस्थानी होत्या.

वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा मुद्दा पुढे नेत गुरबे यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेला जिल्हा परिषदेच्या किती विभागप्रमुखांनी उपस्थिती लावली याचा लेखाजोखा मांडला. या सभागृहाच्या आत्तापर्यंतच्या ५० सभेला केवळ ५ विभाग प्रमुख उपस्थित राहिले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारणा व्हावी, तसेच पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांनाही या गोष्टीची माहिती देण्यात यावी अशी सूचनाही गुरबे यांनी केली. अधिकाऱ्यांना जसे अधिकार दिले आहेत तसे कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पण आहेत याची त्यांनी जाणीव ठेवावी, अन्यथा लोकप्रतिनिधीच्या नात्याने आम्ही त्या दाखवून देऊ असा सज्जड दम देखील गुरबे यांनी दिला. त्यांना विरोधी सदस्य विठ्ठल पाटील आणि जयश्री तेली यांनीही साथ दिली.

राज्य शासनाच्या विविध विभागाकडील खातेप्रमुखांच्या अनुपस्थितीवरूनही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर सभागृहाचा सचिव म्हणून सर्वांना सभेबाबत कळविण्याची जबाबदारी मी पूर्ण केली असून अनुपस्थितीबाबत निर्णय सभागृहाने घ्यावा असे गटविकास अधिकारी शरद मगर यांनी स्पष्ट केले. उपसभापती इराप्पा हसुरे, सहायक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांच्यासह प्रकाश पाटील, विजय पाटील, इंदू नाईक आदी सदस्य आणि विविध खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.