गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आपला नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता आहे. युवा कार्यकर्त्यांना सर्वतोपरी पाठबळ देण्याचे काम पक्षाच्या वतीने सुरू आहे. शिवाय विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेला मतदारांचा कौल आपल्या बाजूने आहे त्यामुळे गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणूक भाजपा पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष समराजीतसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले. ते गडहिंग्लज येथील ‘समर्थ बूथ अभियान’ अंतर्गत कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आज (शुक्रवार) बोलत होते.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, युवा पिढीला व्यवसायात आणण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करण्यासाठी कोल्हापूर येथे समन्वय कक्ष स्थापन केला आहे. युवकांनी तेथे किंवा गडहिंग्लज येथील राजे बँकेत संपर्क साधावा. मागास आयोग, मराठा आरक्षण याबाबत असणारी सरकारची उदासीनता प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवा. प्रत्येक वार्ड पिंजून काढा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील यांनी अभियानाबाबत माहिती दिली. तालुका कार्याध्यक्ष प्रीतम कापसे यांनी स्वागत तर शहराध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी माजी नगरसेविका ज्योती देशपांडे, महिला शहराध्यक्षा बेनिता डायस, अनिल खोत यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.