कोल्हापूर (प्रतिनिधी) : गगनबावड्यातील किल्ले गगनगडावर दरवर्षी होणारा हजरत गैबीपीर  उरूस व विठ्ठलाई देवीचा उत्सव गुरुवारी (दि.२१) होत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उरूस साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीचा उत्सव काळात धार्मिक विधी केवळ दर्गा मुजावर व धर्मगुरू जाफर बाबा यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्यामुळे किल्ले गगनगडावर कोणीही दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन दर्ग्याचे मुजावर रसिक काझी यांनी केले आहे.

हजरत गैबीपीर उरूस व विठ्ठलाई देवीचा उत्सव हा हिंदू-मुस्लिम भाविकांच्या ऐक्याचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी सर्व धर्मीय मिळून हा उरूस आणि उत्सव साजरा केला जातो. मात्र, कोरोनामुळे हा उत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी भाविकांनी आपल्या घरामध्ये नैवद्य करून सुख शांतीसाठी प्रार्थना करावी. दरम्यान, दरवर्षी निघणारी गलेफ मिरवणूक, मनोरंजनाचा कार्यक्रम आणि महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे.