कुंभोज (वार्ताहर) : कुंभोज ग्रामसचिवालयाच्या बांधकामासाठी कोणत्याही स्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही. शिवाय बायपास रस्त्याच्या मुरमीकरण, डांबरीकरणासाठी शासन दरबारी प्रयत्न करून लवकर फंड उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूबाबा आवळे यांनी दिले.

महात्मा फुले सूतगिरणी पेठवडगाव येथे कुंभोज महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुंभोजच्या सरपंच अरुणादेवी पाटील होत्या. आमदार आवळे यांना महाविकास आघाडीच्या वतीने कुंभोजमधील विविध समस्या व त्यासाठी लागणाऱ्या निधीची माहिती गटनेते किरण माळी, माजी सरपंच प्रकाश पाटील, किरण नामे यांनी दिली. बौद्ध समाज मंदिर, चर्चची कामे पूर्णत्वास आली आहेत. त्यासाठी लागणारा निधी, तसेच कुंभोज ग्राम सचिवालयाच्या इमारतीच्या निधीसाठी निधी मंजूर झाला असून, त्याची लवकरच पूर्तता केली जाईल, असेही आमदार आवळे यांनी सांगितले.

यावेळी आमदार राजूबाबा आवळे यांचा सत्कार किरण माळी, प्रकाश पाटील उपसरपंच अनिकेत चौगुले, सरपंच अरुणादेवी पाटील धनाजी तिवढे, सदाशिव महापुरे, दाविद घाटगे, अशोक आरगे, डॉ. धर्मवीर पाटील, महावीर चौगुले, ग्रा.पं. सदस्य शुभांगी माळी, जयश्री जाधव, सुदर्शन पाटील, आपासाहेब पाटील, लखन भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.