इचलकरंजी येथे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन प्रारंभ…

0
62

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे आज (शनिवार) अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर उभारणीसाठी निधी संकलन अभियान शुभारंभ श्रीराम रथयात्रेने करण्यात आला. या रथयात्रेत नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह विविध मान्यवर व रामसेवक सहभागी झाले होते. या वेळी नागरिकांनी फुलांची उधळण करुन रथयात्रेचे उत्साहात स्वागत केले.

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीसाठी घरोघरी संपर्क व निधी संकलन अभियान देशभर १५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात जनजागृतीसाठी श्रीराम रथयात्रा आयोजित केली होती. प्रारंभी राजर्षी शाहू पुतळा येथे नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, माजी आमदार सुरेश हाळवणकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे व ध्वजाचे पूजन करण्यात आले. तसेच श्रीफळ वाढवून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. तालुका अभियानप्रमुख अक्रूर हळदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम छाबडा, कैलास गोयल, अभियान शहरप्रमुख रमेश खंडेलवाल, म्हाळसाकांत कवडे, प्रवीण सामंत, रमेश लाहोटी, सनतकुमार दायमा यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा मुख्य रस्त्याने झेंडा चौकात जाऊन विसर्जित करण्यात आली.

या वेळी व्हिजन इचलकरंजी संघटनेतर्फे रामभक्तांना प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आ. प्रकाश आवाडे यांनी रथयात्रेत येऊन श्रीराम मूर्तीचे दर्शन घेतले. धनगरी ढोल तसेच केसरी ढोल ताशापथक आणि रथयात्रेत सहभागी रामसेवकांच्या भगव्या टोप्या हे मुख्य आकर्षण ठरले. रथयात्रेवर अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले. मिरवणुकीत डॉ. राजेश पवार, विहिंपचे जिल्हामंत्री शिवप्रसाद व्यास, बजरंग दल जिल्हा संयोजक संतोष हत्तीकर, शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, मलकारी लवटे, राजू आलासे, नगरसेवक अमरजित जाधव, मनोज साळुंखे, इराण्णा सिंहासने यांच्यासह रामसेवक सहभागी झाले होते.