कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  छत्रपती  प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे रुग्णांना इतरत्र हलवताना नातेवाइकांची होणारी कसरत, स्ट्रेचरची सध्याची स्थिती अन् त्यातून रुग्णांना वाढलेला धोका टाळण्यासाठी ई अॅम्ब्युलन्सचा पर्याय समोर आला. एका ई-अॅम्ब्युलन्ससाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक होते. याची दखल घेऊन आमदार सतेज पाटील यांनी स्वतःच्या आमदार फंडातून तत्काळ ई-अॅम्ब्युलन्ससाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला आहे.

बॅटरीवर चालणाऱ्या या ई-अॅम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडर, स्ट्रेचर, सलाईन लावण्याची सुविधा आहे. रुग्णासह चालक, डॉक्टर आणि दोन नातेवाईक यात बसू शकतात. ई-अॅम्ब्युलन्स रॅम्पवरून थेट वॉर्डमध्ये नेणे शक्य आहे. ई-अॅम्ब्युलन्समुळे रुग्णाला स्टेचरवरून वॉर्डमध्ये आणण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आखत्यारित चालणाऱ्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये २५ हून अधिक वॉर्ड आहेत. रोज सरासरी १००० ते १२०० पर्यंत रुग्णांची तपासणी होते. हॉस्पिटलमध्ये सहाशेहून अधिक रुग्ण आंतररूग्ण विभागात उपचार घेत आहेत. उपचारासाठी कोकणासह शेजारील कर्नाटकातूनही येथे रुग्ण येतात. अपघात विभागातून आंतररुग्ण विभागात रुग्ण नेण्यासाठी स्ट्रेचर आहेत; पण त्यातील काही खराब झाल्या आहेत. चाके खराब झाल्याने या स्ट्रेचरवरून रुग्णाल्यापर्यंत नेताना वॉर्डबॉयसह नातेवाइकांना तणावाचा अनुभव येत आहे. कित्येकदा वॉर्डबॉय नसेल, तर नातेवाइकांना या खराब स्ट्रेचरवरून रुग्णाला नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे सारे टाळण्यासाठी  ई अॅम्ब्युलन्ससाठी माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला. तत्काळ स्वतःच्या आमदार फंडातून ई-अॅम्ब्युलन्ससाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला आहे.