मुंबई  (प्रतिनिधी) : देशासह राज्यात इंधन दरवाढीचे सत्र सुरूच आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज (बुधवारी) पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे.  पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी २५ पैशांनी वाढ झाल्याने राजस्थानातील श्री गंगानगर शहरात साधे पेट्रोल १००.०७ रूपये झाले आहे. इंधन दरवाढ, गॅस सिलिंडर दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले  आहे. आज सलग नवव्या दिवशी दरवाढ झाली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील परभणी,  मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात पॉवर पेट्रोल १०० रुपयांवर गेले आहे.

आज मुंबईत पेट्रोल  ९६ रुपये,  तर  डिझेलसाठी ग्राहकांना ८६.९८ रुपये मोजावे लागत आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.२५ रुपये आहे. दिल्लीत ८९.५४ रुपये पेट्रोल, डिझेल  ७९.९५ रुपये,  चेन्नईत पेट्रोल  ९१.६८ रुपये,  डिझेल  ८५.०१ रुपये,  कोलकात्यात पेट्रोल ९०.७८ रुपये,  डिझेल  ८३.५४ रुपये,  बंगळुरू पेट्रोल ९१.५४ रुपये, डिझेलचा दर ८४.७५ रुपये असा आहे.