भुदरगड तालुक्यात ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा : विद्यार्थी नेटवर्कच्या शोधात…

0
297

गारगोटी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. पर्यायी मार्ग म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणात परवड होताना दिसत आहे. कोरोनामुळे शाळा, कॉलेज ऑनलाईन सुरू करण्यात आले आहेत. मात्र, ऑनलाईन क्लास अटेंट करताना भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची परवड होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील म्हासरंग, अंतिवडे, डेळे, भटवाडी, थड्याचीवाडी यासारख्या अनेक दुर्गम गावातील विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासासाठी गावापासून लांब डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधून ऑनलाईन क्लास अटेंट करत आहेत. या गावांत कुठंही नेटवर्क नाही. त्यामुळे गावातील मुलांना ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी पायपीट करून डोंगरमाथ्यावर जावं लागतं.

नेटवर्क अभावी हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणासाठी रानावनात, डोंगरमाथ्यावर जातात तेंव्हा जंगली श्वापदांपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना जीव मुठीत धरून अभ्यास करावा लागतो. या भागातील जंगलात सर्रास हिंस्त्र श्वापदे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचे पालकांनी सांगितले. शासनाने गावातच इंटरनेटचा सक्षम पर्याय उपलब्ध केल्यास या मुलांची होणारी परवड थांबणार असल्याचेही पालकांनी सांगितले.