कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एक ते १५ नोव्हेंबरची एकरकमी एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच, कारखान्याने २० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील तोडणी- वाहतूक बिलेही खात्यावर जमा केली आहेत.

या पत्रकात म्हटले आहे की, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गळीत हंगाम १९ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु झाला. त्यापासून ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंतची उसविले एकरकमी एफआरपी २,९६०  प्रमाणे यापूर्वीच आधार झाली आहेत. कारखान्याने एक ते १५ नोव्हेंबर या काळात  ८८,३१९ टन  उसाचे गाळप केले आहे. एकरकमी एफआरपी प्रतिटन २,९६० रुपये प्रमाणे ही ऊसबिल रक्कम २६ कोटी, १४ लाख,२४,२४० रुपये एवढी होते. त्यापैकी, ४ कोटी, ५ लाख, ५८ हजार, ६७१ रुपये एवढी रक्कम विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केली आहे. २२ कोटी, ९ लाख, ६५ हजार, ५६९ रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत.

कारखान्याने आजअखेर २ लाखाहून अधिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. गळीत हंगामात ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवलेला आहे, त्यांनी आपापल्या संबंधित बँकांमध्ये व सोसायट्यामध्ये गुरुवारपासून (दि.२५) संपर्क साधावा. व ऊस बिलाच्या रकमा व पावत्या घेऊन जाव्यात, असे आवाहन घाटगे यांनी केले आहे.