इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे शासकीय निधीचा वापर खाजगी ठिकाणी होत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला. ग्रामपंचायतीमध्ये आज (मंगळवार) समाजबांधवांनी  ठिय्या मारत सरपंच खंडू खिलारे यांना धारेवर धरले. अखेर निधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

मराठा सांस्कृतिक भवन हे संपूर्ण गावचे असूनही कंपाऊंड कामासाठी ग्रामपंचायतीकडून निधी दिला जात नाही. मात्र नजीक असलेल्या क्रीडा मंडळाची सार्वजनिक दप्तरी नोंद नसताना देखील या ठिकाणी कंपाऊंडचे काम ग्रामपंचायतीद्वारे सुरू आहे. याबद्दल संतप्त भावना व्यक्त करीत मराठा समाजातील शेकडो लोकांनी सरपंच खंडू खिलारे यांना धारेवर धरले. अखेर दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामपंचायतीच्या निधी देण्याच्या आश्‍वासनानंतर नागरिक शांत झाले.

ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निधीतून जांभळी येथे मराठा समाजाचे सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. सांस्कृतिक भवनाच्या कंपाऊंडसाठी ग्रामपंचायतीकडून निधीची मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले होते. सांस्कृतिक भवनाच्या नजीक असलेल्या एका खाजगी क्रीडा मंडळासमोर ग्रामपंचायतीने निधी मंजूर करून कंपाऊंडचे काम सुरू केले. हे निदर्शनास आल्यानंतर मराठा समाजबांधवांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली. तरीदेखील ग्रामपंचायतीने याकडे कानाडोळा केला. त्यामुळे सांस्कृतिक भवन जागेतील अतिक्रमण, कंपाऊंडसाठी निधी व वाढीव जागेसाठी मंगळवारी मराठा समाज आक्रमक झाला. अखेर ग्रामपंचायतीत येऊन सरपंचांना धारेवर धारले.

एकीकडे सार्वजनिक दप्तरी नोंद नसताना क्रीडा मंडळासाठी शासकीय निधी वापरला जात आहे. तर दुसरीकडे मराठा समाज भवनाच्या कंपाऊंडसाठी निधी नाकारला जात असल्याने मराठा समाज संतापला. त्यांनी सरपंचांसह उपस्थित सदस्यांना ही चूक निदर्शनास आणून दिली. सुमारे दोन तास भवनच्या कंपाऊंडसाठीच्या निधीवर ठाम राहात समाजबांधवांनी ग्रामपंचायतीतच ठिय्या मारला. ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत यावर योग्य तोडगा काढून निधी उपलब्ध करण्याच्या आश्‍वासनानंतर नागरिक शांत झाले.