कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृत्रिम रेतनाद्वारे जास्तीत जास्त मादी वासरेच जन्मास येऊन दूध उत्पादन वाढावे व उत्पादकास आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत ९० टक्के मादी वासरेच जन्मास येतील अशा  लिंगविनिश्चित वीर्यामात्रा १८१ रुपये इतक्या नाममात्र किमतीत उपलब्ध करणेत येणार आहेत. गोकुळ मार्फत मादी वासरेच जन्मास येतील अशा लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा उपलब्ध करणेत आल्या होत्या, जादा किमतीमुळे  उत्पादकाकडून त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अशा वीर्यमात्रा नाममात्र किंमतीत शासनाकडून उपलब्ध व्हाव्यात यासाठी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार तसेच पशुसंवर्धन आयुक्त यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यास यश आले. या निर्णयामुळे उत्पादकांच्या गोठ्यात जातिवंत दुधाळ जनावरांची पैदास वाढणार असून दूध उत्पादनातही वाढ होणार आहे.

लिंगविनिश्चित केलेल्या विर्यमात्रांची बाजारातील सरासरी किंमत १००० ते १३०० रुपये इतकी आहे. राज्यात ४ मार्च २०१५ पासून संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करणेत आलेला आहे. तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यामध्ये वाढ झालेने शेतीकामासाठी बैलांची आवश्यकता कमी झालेली आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणाऱ्या नर वासरांचे संगोपन करणेसाठी उत्पादकांना अनावश्यक खर्च सोसावा लागत होता. तसेच नर वासरांचे  संगोपन करावे लागल्याने दुधाळ जनावरांना चारा कमी पडतो. परिणामी अनुवांशिक क्षमता असुनहि त्यांच्या दुध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यापुढे पारंपारिक वीर्यमात्रा ऐवजी लिंगविनिश्चित वीर्यमात्र निर्मिती या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेल्या वीर्यमात्रांचा गाई-म्हशीमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर केलेस त्यापासून ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.

शासन निर्णयानुसार केंद्र सहाय्यित (६०:४०) राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत हा कार्यक्रम २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. वरील लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यमात्रा राज्यातील सहकारी / खाजगी दूध संघांना त्यांच्या दूध उत्पादकाकडील जनावरांना कृत्रिम रेतन करणेसाठी मागणीप्रमाणे १८१ रुपये प्रति वीर्यमात्रा या दराने उपलब्ध करण्यात येणार आहेत. दूध संघ आपले १०० रुपये घालणार असून सदरची लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा दुध उत्पादकांना प्रति विर्यामात्रा ८१ रुपये या दराने उपलब्ध होणार आहेत. या लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा गोकुळ दूध संघामार्फत लवकरच उपलब्ध होतील, असे अरुण डोंगळे यांनी सांगितले.