बांबवडे (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील बाजारपेठेत अज्ञात शिवसैनिकांनी प्रतिष्ठापना केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा कोणत्या ही परिस्थितीत हटवू देणार नाही. अशी ठाम भूमिका शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी आज (सोमवार) व्यक्त केली.

काल (रविवार) मध्यरात्री अज्ञात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली. तातडीने येथे पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार गुरु बिराजदार, पोलीस निरीक्षक  प्रवीण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच हा पुतळा विनापरवानगी आणि बेकायदेशीर उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सत्यजित पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे,   शिवसेना उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी, सरपंच सागर कांबळे, बांबवडे शहर शिवसेना अध्यक्ष सचिन मुडशिंगकर आदींसह शिवसैनिकांनी पुतळ्या शेजारी ठिय्या मारला.

माजी आ. पाटील म्हणाले की, विनापरवानगी पुतळा उभा करण्यात आला असला तरी शिवभक्तांचा हेतू स्पष्ट आहे. तालुक्यात बांबवडे बाजारपेठ मोठी आहे. येथे शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. महाराजांचा इतिहास सांगणारा हा तालुका आहे. त्यामुळे येथे पुतळा उभा करण्यात आला आहे. याबाबत आवश्यक त्या परवानग्या घेतल्या जातील. पोलीस चौकीच्या समोर पुतळा उभा केल्याने सुरक्षा दृष्टीने हे ठिकाण योग्य आहे. पुतळ्याची सर्व जबाबदारी घेण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.