कोल्हापूर (श्रीधर कुलकर्णी) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशाने अनेक स्थित्यंतरे पहिली आहेत. अनेक  प्रगतीची शिखरे गाठली असली तरी स्वातंत्र्याने काय कमावले आणि काय गमावले याचा आढावा घेताना बऱ्याच गोष्टींचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा केवळ अन् केवळ भारतीयच आहे. ही खूणगाठ प्रत्येकाने बांधून घेतली पाहिजे, कारण हा देश कुण्या एका व्यक्तीचा, धर्माचा वा जातीचा नाही. पक्ष, प्रांत, वर्ण, धर्म ह्या चौकटीतून बाहेर अगळी वेगळी ओळख ह्या देशाची आहे. त्यामुळे हा देश माझा आहे, याचे भान ठेवणे गरजेचे आहे.

‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ असे मोठ्या अभिमानाने म्हणतो आपण ? पण त्याची कितपत काळजी घेतो, ह्याचा विचार केलाय कधी या देशाला प्रगतशील म्हणावं तरी कसं ? इथला प्रत्येक घटक स्वताला मागास म्हणून घेण्यासाठी धडपडतोय..! या देशात दंगली घडविण्यासाठी बॉम्ब टाकण्याची गरज नाही. कारण या देशात नुसत्या अफवांवर दंगली घडतात हे वास्तव नाकारून चालणार नाही. खूप अपेक्षा होत्या महापुरुषांच्या स्वातंत्र्याकडून; मात्र त्या धुळीला मिळाल्या आहेत. तसा हिशेब बराच मोठा आहे. तो प्रत्येकाने तपासला पाहिजे.

 भारत आज एक प्रबळ प्रजासत्ताक म्हणून जगामध्ये दमदारपणे वाटचाल करताना दिसते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे; परंतु स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या देशभक्तांच्या बलिदानाची आज कुणालाच फिकीर नाही याचा अनुभव वारंवार येतो. राजकीय सत्ता व त्या माध्यमातून मिळणारी अफाट संपत्ती जमा करण्याकडेच राजकारणी मंडळी लक्ष ठेवून आहेत.

 स्वातंत्र्यदिनदिवशी तिरंगा ध्वजापुढे अभिवादन केले की आपली इतिकर्तव्यता संपली अशी मनोधारणा झालेल्या पुढार्‍यांचे काय करणार? लोकशाहीमध्ये जनता हीच खरी मालक असते, हेच हे राजकारणी विसरत चालले आहेत. देशावर प्रेम करणे म्हणजे भ्रष्टाचार न करणे, हिंसाचार न करणे, प्रामाणिक वागणे या गोष्टी मनावर ठसणे आवश्यक असताना आजच्या काळात देशभक्तीचीच तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या देशावर सदासर्वकाळ प्रेम केले पाहिजे. देशावर प्रेम म्हणजेच येथील परंपरा, संस्कार आणि सर्वसामान्य लोकांवरही प्रेम करणे आलेच.

स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयांचा नसांमध्ये रक्तासारखा संचार करत असतो. स्वतंत्र हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासीयांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडा देखील प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे. भारतीय संविधानात भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रतेची ओळख करून दिली आहे. तसेच त्यांना विशेष अधिकार देखील दिले आहे. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्या समृद्धीच्या उंचीवर पोहोचला आहे. आज संपूर्ण जगात भारत हा आशेचा किरण बनून सूर्यासम आकाशात चमकत आहे.

भारताला हे स्वातंत्र्य सहजच मिळालेले नाही. यासाठी देशातील शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले आहे. आम्हाला त्याचे नेहमीच आभार मानायला हवे. आज आपण या स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, हे आपल्याला भारतमाताच्या वीर सपूतांची आठवण करून देते. प्रत्येक भारतीयाला आपल्या अधिकारांपेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे, तरच आपले देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल.