नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिनरल वॉटरपेक्षा पेट्रोलचे दर कमी आहेत. परंतु राज्य सरकारने लावलेल्या करांमुळेच पेट्रोलचे दर वाढले आहेत. तसेच देशभरात कोरोना लस मोफत दिल्याने इंधनाचे दर वाढवले आहेत, असा अजब दावा पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी केला आहे. या दाव्यामुळे तेली यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

देशात सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून, पेट्रोल आणि डिझेलच्या वारंवार दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या पेट्रोलचे दर १११ तर डिझेल १०० रुपयांवर विकले जात आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून केंद्र सरकार यातून काहीतरी मार्ग काढेल, असे वाटत असताना केंद्रीय मंत्रीच असे युक्तिवाद करू लागल्याने संताप व्यक्त होत आहे.

केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी एका कार्यक्रमात बोलताना पेट्रोल, डिझेल दरवाढीवर भाष्य केले.. ते म्हणाले, ‘मिनरल वॉटरची किंमत पेट्रोल, डिझेलपेक्षा जास्त आहे. पेट्रोलची किंमत ४० रुपये आहे. मात्र, राज्य सरकार जास्त कर लावते. पेट्रोलियम मंत्रायल केवळ ३० रुपये आकारते. मात्र राज्य सरकारच्या करामुळे हा दर १०० रुपयांवर पोहोचतो.