कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपा कोल्हापूरच्या वतीने आज (शनिवार)  भाजपा कार्यालय बिंदू चौक येथे सध्याच्या काळात कोविड रुग्णांना उपयुक्त असणाऱ्या ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचा शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ पाहता सेवाकार्य म्हणून भारतीय जनता पार्टीच्यावतीने ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर बँक हि संकल्पना सुरु करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कोव्हिड रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरीराची श्वासनक्रिया नैसर्गिक पद्धतीने सुरु होण्यासाठी मदत करणारे हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरत आहे. हे मशीन डॉक्टरांच्या सल्यानुसार वापरायचे असून घरी ऑक्सिजनची गरज आहे, असे डॉक्टरांनी सुचविलेल्या गरजू रुग्णांसाठी ही सुविधा भाजपातर्फे  मोफत सुरू करण्यात आली आले. मशीनची खरेदी रक्कम सध्या चढ्यादराने होत असून सर्व सामान्य नागरिकांना एक स्वतंत्र मशीन खरेदी करणे परवडणारे नाही. त्याचबरोबर भाडेतत्वावर देखील अशा मशीन आता उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सार्वसामान्य माणसांचा विचार करता ही सेवा मोफत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, ग्रामीण सरचिटणीस विठ्ठल पाटील, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, डॉ. महेंद्र यादव, सचिन साळोखे, प्रितम यादव, पृथ्वीराज जाधव, महेश मोरे, सिद्धेश्वर पिसे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.