संघवी हॉस्पिटलमध्ये मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध…

0
28

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गेली ३५ वर्ष प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी हे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी या वैद्यकीय सेवेला सामाजिक उपक्रमाची सुद्धा जोड आहे. यातूनच त्यांनी आज (शुक्रवार) कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत. डॉ. संघवी यांच्या या सामाजिक आणि वैद्यकीय सेवेचा आदर्श सर्वाना अनुकरणीय आणि प्रेरणादायी असल्याचे माजी खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी शेवटचा श्वास घ्यावा लागत आहे. ही समस्या जाणून घेत, कोल्हापुरातील प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांनी परदेशी बनावटीचे १० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशिन्स आज कोरोना रुग्णांच्या सेवेत माजी खा. धनंजय महाडिक आणि सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

प्रतिमिनिट हवेतून सात लिटर्स ऑक्सिजन संकलीत करण्याची क्षमता या उपकरणांची असून त्याची एकूण किंमत १० लाख रुपये इतकी आहे. भवानी मंडपातील संघवी हॉस्पिटलमधून गरजू रुग्णांना हे मशिन्स कोरोना रुग्णावर औषधोपचार करणाऱ्या डॉक्टर्स किंवा हॉस्पिटलच्या शिफारशीवरून आजपासून मोफत देण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. डॉ. संघवी यांनी अमेरिका स्थित जैना आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्यातून १० ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर उपलब्ध केले आहेत. यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती महाडिक यांनी, डॉ. संघवी यांच्या भवानी मंडपातील संघवी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बँकच सुरु केली असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. रमेश निगडे, प्रसाद टेंगशे,  अॅड. प्रकाश हिलगे,  कल्पना संघवी, स्नेहल संघवी-पुनाकर, जैनेश पुनाकर, रोटरी क्लबचे नासिर बोरसदवाला, इनरव्हील क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.