मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज दुपारी राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह खा. सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं. यानंतर टोपे यांनी ही घोषणा केली.

टोपे म्हणाले की, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रक्रियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात येईल.  निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलनात अग्रेसर आहे. मात्र आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या वेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरुण थोरात आदी उपस्थित होते.