राशिवडे (प्रतिनिधी) : सध्या उन्हाचा तडाखा जास्त प्रमाणात आहे त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्य प्राणी जंगली भाग सोडून नागरी वस्तीत येताना दिसत आहेत. अत्यवस्थ अवस्थेत असणाऱ्या प्राण्यांना वेळेत उपचार नाही मिळाले तर ते दगावण्याची शक्यता जास्त असते यामुळे नागरिकांनी अशा वेळी त्वरित वन विभागाशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे असे आवाहन वन परिमंडळ अधिकारी आर. एस. तिवडे यांनी केले आहे.

आज (बुधवार) राशिवडे येथे नागरी वस्तीत एक कोल्हा अत्यवस्थ अवस्थेत सापडला. याची माहिती मिळताच तिवडे यांनी वनरक्षक उमा जाधव, वनमजूर यांच्या टीमने त्याला कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले असता हा कोल्हा मरण पावला. शवविच्छेदनानंतर असं लक्षात आलं की गेले दोन-तीन दिवस पाणी न मिळाल्यामुळे त्याचा उष्माघाताने मृत्यू झाला.